चिपळूण : “मी चिपळूणकरांना भाषण देण्यासाठी आलो नाही, तर शहर स्वच्छ करण्यासाठी आलो आहे,” अशा शब्दांत प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेता आणि चिपळूण नगर परिषदेचे स्वच्छता दूत ओंकार भोजने यांनी प्लास्टिकमुक्त मोहिमेच्या प्रारंभाला प्रेरणादायी सुरुवात केली. प्रांत कार्यालय, चिपळूण नगर परिषद व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ सर्वेक्षण २०२५, माझी वसुंधरा अभियान ६.० व प्लास्टिकमुक्त चिपळूण उपक्रमांतर्गत शुक्रवारी हा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी अवघे चिपळूणवासीय एकवटले होते.
येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण शहरात अकरा ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासाठी अकरा पथके तयार करण्यात आले होते.
तीन हजारहून अधिक विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, व्यापारी, राजकीय प्रतिनिधी, तसेच सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. अभिनेता भोजने यांनी चिपळूण नगर परिषद येथे आयोजित उद्घाटन सोहळ्यानंतर घंटागाडीतून जनजागृती करीत व्यापाऱ्यांना प्लास्टिकमुक्तीचे पत्रक वाटप केले.
‘मी केवळ ब्रँड अॅम्बेसडर नसून, या चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. चिपळूणमधील प्रत्येक सुजाण नागरिक या मोहिमेचा खरा ब्रँड अॅम्बेसडर आहे,’ असे उद्गार अभिनेते ओंकार भोजने यांनी काढले.
यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या समारोप कार्यक्रमाला आमदार शेखर निकम उपस्थित होते. त्यांनी प्रांताधिकारी व मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
या उपक्रमात माजी नगरसेवक आशिष खातु, राम रेडीज, सीमा चाळके, मनोज शिंदे, रसिका देवळेकर, मिलिंद कापडी, शहानवाज शहा यांच्यासह सर्वपक्षीय माजी नगरसेवक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सुजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
वृक्षारोपण, देवराई भेट
या उपक्रमांतर्गत गांधारेश्वर तिठा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. यतीन जाधव, प्रकाश देशपांडे, कवी अरुण इंगवले उपस्थित होते. त्यानंतर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या संकल्पनेतून कळंबस्ते येथे उभारण्यात येणाऱ्या देवराईला ओंकार भोजने यांनी भेट दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 21/Jun/2025













