रत्नागिरी: आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रत्नागिरीतील प्रसिद्ध पत्रकार राजन चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एलएलबी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
राजन चव्हाण यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सापुचेतळे येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुढील महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरी येथे पूर्ण केले. अत्यंत हलाखीची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ परिस्थिती असतानाही, राजन चव्हाण यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. ‘पुढारी न्यूज’ या वृत्तवाहिनीचे रत्नागिरी प्रतिनिधी म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.
पत्रकारितेची जबाबदारी सांभाळत असतानाच, उच्च शिक्षणाची जिद्द बाळगून त्यांनी रत्नागिरी येथील भागोजी शेठ कीर लॉ कॉलेजमधून वकिलीचे शिक्षण घेतले. आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी एलएलबी परीक्षेत यश मिळवले आहे.
या यशाचे संपूर्ण श्रेय राजन चव्हाण यांनी आपली बहीण योगिता शिवलकर यांना दिले आहे, ज्यांनी त्यांना या प्रवासात नेहमीच पाठिंबा दिला. राजन चव्हाण यांच्या या यशाने हे सिद्ध केले आहे की, जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर कोणतीही परिस्थिती यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही.












