साखरप्यात घरफोडी : साठ वर्षांच्या वृद्ध महिलेचे लाखो रुपयांचे दागिने लंपास!

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा सुर्वेवाडी येथे एका ६६ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरातून तब्बल १ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १० सप्टेंबर २०२४ ते १० जून २०२५ या कालावधीत घडली असून, २१ जून २०२५ रोजी याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साखरपा येथील सरिता सुरेश सुर्वे (वय ६६) यांच्या राहत्या घरातील माळ्यावर ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीत सोन्याचे दागिने ठेवले होते. घरात राहत असलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि स्वतःच्या फायद्यासाठी हे दागिने चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चोरलेल्या दागिन्यांमध्ये ६८ ग्रॅम ७९८ मिली सोन्याचे दागिने असून, त्यांची अंदाजित किंमत १,१०,००० रुपये आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका महिला आणि शरयू दिगंबर बने (वय २५, दोघे रा. भडकंबा बनेवाडी, ता. संगमेश्वर, सध्या रा. साखरपा सुर्वेवाडी, ता. संगमेश्वर) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ नुसार गुन्हा (गु.र.नं. ७२/२०२५) दाखल केला आहे. पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 23-06-2025