मंडणगड : चिंचाळी पुलाच्या खालील बाजूस भेगा

मंडणगड : आंबडवे लोणंद राष्ट्रीय महामार्गावर चिंचाळी धरणाजवळील पूल नादुरुस्त झाला आहे. या पुलाच्या खांबावर झाडे उगवली असून काही खांब पडले आहेत. पुलाच्या खालच्या बाजूला भेगा पडल्या असल्याने हा पूल धोकादायक झाला आहे.

मंडणगडमधून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिंचाळी धरणाजवळ असलेला पूल रात्रीचे वेळी कोसळल्याची अफवा परिसरातील गावात पसरल्याने आजूबाजूच्या गावात पसरली. या रस्त्यावरून दापोली व मंडणगड जाणारी वाहनांची मोठी वर्दळ असल्याने काही गावातील मंडळीनी घटनास्थळी पाहणी केली असताना पुलाच्या खालच्या बाजूस मोठ्या भेगा पडल्याचे दिसून आले. यामुळे येथे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे, परतु सद्यस्थितीत जुन्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. या पुलाच्या खांबावर झाडे

उगवली असून काही खांब उखडून पडल्याने पुलाचे कटडे तुटले आहेत. हा पूल धोकादायक झाला असूनही तसे फलकही प्रशासनाकडून लावलेले नाहीत. यासंदर्भात ठाकरे शिवसेनेने या पुलाची पाहणी करून इंद्रायणी पुलावरील दुर्घटना लक्षात घेता या नादुरुस्त पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी ठाकरे शिवसेनेने केली आहे. सद्यस्थितीत मंडणगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून या रस्त्याने मुंबईसह कोकणातील पर्यटकांची वर्दळ जास्त असते. तसेच गणपती सणाच्या गाड्यांची वाहतूक नजरेसमोर ठेवून या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. संबंधित ठेकेदार व यंत्रणेला याबद्दल सुचित करून धोका टाळावा, असे निवेदनही ठाकरे शिवसेनेने तहसीलदार अक्षय ढाकणे यांना दिले आहे. निवेदनावर जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर, तालुका संघटक जितेंद्र दवंडे यांच्या सह्या आहेत.

या वेळी बाळा खेडेकेर, जितेंद्र दवंडे यांच्यासह दशरथ सापटे, सुषमा राणे, अरविंद येलवे, कलंदर मुंगरुस्कर, अमित चिले आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 23/Jun/2025