रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील राजीवडा समुद्रकिनारी, भाट्ये पुलाखाली सुरू असलेल्या एका नवीन मच्छीमार नौकेच्या बांधकामादरम्यान भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. वेल्डिंगच्या कामामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे. आगीत एक बोलेरो पिकअप व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली, तर नौकेचा मागील भाग मोठ्या प्रमाणात जळाला.
राजीवडा येथील जावेद वस्ता यांच्या मालकीच्या या लाकडी आणि फायबरच्या नौकेमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंग सुरू असतानाच शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून उडालेल्या ठिणग्या बाजूला उभ्या असलेल्या बोलेरो व्हॅनच्या दिशेने गेल्या. यामुळे मोठा स्फोट होऊन नौका आणि व्हॅनने पेट घेतला. आकाशात धुराचे मोठे लोळ उठल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
आगीची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन अधिकारी महेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली जवान नरेश मोहिते, शिवम शिवलकर, देवदास गावडे, संकेत विलणकर, अनिस तोडणकर, अमोल तळेकर, परेश सावंत आणि चंदावले यांनी अग्निशमन बंबासह धाव घेतली. रविवारी दुपारच्या सुमारास लागलेली ही आग अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी विझवण्यात यश आले.
या आगीत बोलेरो पिकअप व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली, तर नौकेचा मागचा भाग जळून मोठे नुकसान झाले. बोलेरो व्हॅनमध्ये काही रासायनिक पदार्थ असावेत, तसेच नौकेच्या फायबरच्या सुट्या भागांमुळे आणि समुद्रकिनाऱ्यावरील जोरदार वाऱ्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली आणि धुराचे लोळ उठले, असे सांगितले जात आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 23-06-2025













