लांजा : लांजा शहरातील माऊली नगर येथील एका फ्लॅटमधून तब्बल १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. १५ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २१ जून रोजी सकाळी ७.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली असून, २१ जून रोजी रात्री ८.५६ वाजता लांजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माऊली नगर येथील साई समर्थ माऊली, सी-००५ मध्ये राहणाऱ्या रुही सुयोग तांबे (वय ३७) यांच्या राहत्या फ्लॅटमधून हे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्याने अज्ञात चोरट्याने ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चोरलेल्या दागिन्यांची एकूण किंमत १,४८,००० रुपये आहे.
याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ) नुसार (गु.र.नं. १२२/२०२५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा पोलीस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 23-06-2025













