पुणे : स्पर्धा परीक्षेत गैरप्रकाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वीच उमेदवाराने आयोगाच्या अर्ज प्रणालीमध्ये खात्याची आधार व इतर पद्धतीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ही पडताळणी केली नाही तर उमेदवारांना कोणत्याच पदासाठी अर्ज करता येणार नाही. यासंदर्भात एमपीएससीने परिपत्रक शुक्रवारी जाहीर केले. स्पर्धा परीक्षेतील पारदर्शकेतसाठी हा चांगला निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी दिली.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अशी असेल पद्धत
शासन सेवेतील विविध पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठी संबंधित उमेदवाराला प्रथम ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर विहित पद्धतीने नोंदणी करावी लागेल. तसेच विहित पद्धतीने नोंदणीनंतर संबंधित खात्यामध्ये अहतसंदर्भातील तपशील नोंदवावा लागेल. आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीवर नोंदणीकृत उमेदवारांच्या ओळख पडताळणीसाठी उमेदवारांच्या खात्यात आधार क्रमांक नोंदवण्याची पद्धती व सुविधा लागू केली आहे.
गैरप्रकार थांबतील
मागे पूजा खेडकरसारखे प्रकरण झाले. त्यामुळे अनेक बदल स्पर्धा परीक्षेच्या नियमावलीत केले जात आहेत. आता ई-केवायसीमुळे बनावट प्रोफाइलला आळा बसून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल- महेश बडे, स्पर्धा परीक्षाप्रतिनिधी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 23/Jun/2025













