खेडमध्ये भीषण अपघात : बुलेटच्या धडकेत ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

खेड : खेड तालुक्यातील चिरणी येथे १७ जून रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात ५३ वर्षीय मोहन मनोहर आंब्रे यांचा मृत्यू झाला. चिरणी शहीद स्मारकाजवळील गडबडा/दांडा नदीवरील पुलावर भरधाव वेगात आलेल्या बुलेटने समोरून येणाऱ्या बुलेटला धडक दिल्याने हा अपघात घडला.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात २१ जून रोजी दुपारी २.०७ वाजता गुन्हा (गु.र.नं. १९४/२०२५) दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६ (२), २८१, १२५(अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १४६/१९६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोटे येथील नवीन वसाहत येथे राहणारे मोहन मनोहर आंब्रे (मूळ रा. चिरणी खालचीवाडी) हे त्यांची बुलेट (एम.एच ०८ एयु ३४९५) घेऊन चिरणी येथील घराचे काम उरकून लोटेला परत येत होते. चिरणी शहीद स्मारकासमोरील गडबडा/दांडा नदीवरील पुलावर ते आले असता, लोटे बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या बुलेट (एम.एच ०८ एके २२११) वरील चालक आदित्य दिलीप मोरे (वय २०, रा. आंबडसपेठ, ता. खेड) याने आंब्रे यांच्या बुलेटला समोरून धडक दिली.

आरोपी आदित्य मोरे याच्या बुलेटचा विमा संपलेला असताना त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे गाडी चालवल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या धडकेत मोहन मनोहर आंब्रे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आदित्य मोरेलाही किरकोळ दुखापत झाली असून, दोन्ही बुलेटचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेचा तपास खेड पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 23-06-2025