जयगड : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरात जे.एस.डब्ल्यू पोर्टजवळ नांगर टाकून उभ्या असलेल्या ‘एम.व्ही. डाली’ जहाजावरील ५१ वर्षीय फिलिपिनो सेकंड इंजिनीअर एलमीर अल्कारेज मोलीना यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना २० जून रोजी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास घडली. ही माहिती जयगड पोलिसांनी २१ जून रोजी पहाटे १.२६ वाजता गुन्हा दाखल केल्यानंतर समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘एम.व्ही. डाली’ हे जहाज इजिप्तमधून कोळसा घेऊन जे.एस.डब्ल्यू पोर्टपासून सुमारे ५ नॉटिकल मैलांवर समुद्रात नांगर टाकून उभे होते. एलमीर अल्कारेज मोलीना हे आपल्या कॅबिनमध्ये जेवण करून गेल्यानंतर परत आले नाहीत. त्यामुळे त्यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या इतर क्रू मेंबर्सना ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले, तरीही त्यांची शुद्ध न आल्याने त्यांना जे.एस.डब्ल्यू पोर्टच्या ‘भीम टग’मधून जे.एस.डब्ल्यू पोर्ट जेटी क्रमांक ए-४ येथे आणण्यात आले.
तेथे खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टगमध्येच त्यांची तपासणी केली असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे जयगड बंदरात खळबळ उडाली आहे. जयगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी आमू. क्रमांक १९/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 23-06-2025













