देवरुखजवळ गावठी दारूचा साठा जप्त; एकाला अटक

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील गुरववाडी टाकळीचा उंबर परिसरातून देवरुख पोलिसांनी ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी महेश रत्नाकर पाष्टे (वय ४२, रा. निवे बुद्रुक, पाष्टेवाडी, ता. संगमेश्वर) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई २१ जून रोजी सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

देवरुख पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७ जून रोजीच गुन्हा (गु.र.नं. ७३/२०२५) दाखल करण्यात आला होता, आणि त्यानंतर २१ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम सिताराम पंदरे (सपोफौ/११६७) यांना निवे बुद्रुक येथे गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी आपल्या पथकासह टाकळीचा उंबर येथील मोकळ्या जागेत छापा टाकला असता, आरोपी महेश पाष्टे हा ५५० रुपये किमतीची ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगून असताना मिळून आला. पोलिसांनी दारूसह इतर साहित्य असा एकूण ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी महेश पाष्टे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, देवरुख पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 23-06-2025