चिपळूण : कामथे येथे नदीत टँकरने सोडले रसायनमिश्रित पाणी

चिपळूण : कामथेत टँकरद्वारे नदीत रसायन सोडले जात असल्याचा प्रकार रात्री नऊ वाजता उघडकीस आला. ग्रामस्थांनी दोन टँकर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तत्पूर्वी, तीन टँकरमधून तब्बल ६० हजार लिटर रसायनमिश्रित पाणी नदीत सोडण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. कामथेतील पाणी शिवनदीमार्गे वाशिष्ठी नदीला मिळते. तसेच या नद्यांच्या मार्गावर परिसरातील गावांच्या नळ पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे चिपळूण शहरासह परिसरातील गावांच्या नळ पाणी योजनांचे पाणी दूषित होण्याचा धोका आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कामथे हरेकरवाडी येथे एका धाब्यासमोरच मोठा नाला आहे. त्या ठिकाणी शनिवारी (ता. २१) रात्री नऊ वाजता पाच टैंकर एका रांगेत उभे करण्यात आले होते. टँकरचे चालक-वाहक धाब्यावर जेवणासाठी थांबले असतील असा येथील नागरिकांचा सुरुवातीला समज होता. मात्र, गावातील काही तरुण खेकडे पकडण्यासाठी रात्री जेव्हा नदीत गेले तेव्हा त्यांना तीन इंचाच्या पाईपने रासायनिक पाणी नदीत सोडत असल्याचे आढळून आले. त्या तरुणांनी ही गोष्ट चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती अनंत हरेकर यांना सांगितली.

श्री. होकर घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी नदीत पाणी सोडत असलेले टँकर अडवले. स्थानिक ग्रामस्थांनी टँकरला घेराओ घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर तेथील तीन रिकामे टँकर घेऊन चालकांनी पलायन केले. तसेच भरलेल्या टँकरवरील चालक व वाहकही तेथून प्रसार झाले. श्री. हरेकर यांनी पोलिस आणि महसूल विभागाला या घटनेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही टँकर ताब्यात घेतले असून, पंचनामा केला

कामथे गावातील नद्यांना यावर्षी चढणीचे मासे चढले नाही. त्यामुळे हा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू असल्याचा संशय आहे. आम्ही येण्यापूर्वी तीन टैंकर खाली करण्यात आले. गाणे खडपोली एमआयडीसीतील काही कारखानदारांचे हे पाणी आहे. प्रशासनाने पाण्याचे नमुने तपासावे आणि हे पाणी नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे किंवा नाही याची प्रथम चौकशी करावी. पोलिस प्रशासनाने या घटनेचा सखोल तपास करावा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करावी-अनंत हरेकर, माजी सभापती, चिपळूण

कामथे हरेकरवाडी येथे दोन टँकर ताब्यात घेतले आहेत. त्यातील रसायनाचे नमुने घेतले आहेत. हे रसायन नक्की कोणत्या कंपनीचे आहे. ते अजून स्पष्ट झालेले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यांनी विहीर, नदी आणि मोकळ्या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. हा अहवाल दोन दिवसांत येईल, अशी अपेक्षा आहे- फुलचंद्र मेंगडे, पोलिस निरीक्षक, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 23/Jun/2025