रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ अडखळवन येथील ४४ वर्षीय रणजित शांताराम डोंगरे यांचा मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोटातील गंभीर इन्फेक्शनमुळे त्यांचा १८ जून रोजी दुपारी २.५० वाजता मृत्यू झाल्याची नोंद २१ जून रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणजित डोंगरे हे नालासोपारा येथे राहत होते. त्यांच्या मुलीला शाळेला सुट्टी लागल्याने ते तिला मूळ गावी म्हाप्रळ अडखळवन येथे सोडून आले होते. याच दरम्यान, त्यांच्या पोटात अचानक दुखायला लागले. त्यांना तातडीने म्हाप्रळ येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारांसाठी माणगाव येथे हलवण्याचा सल्ला दिला.
माणगाव येथील डॉक्टरांनी रणजित डोंगरे यांच्या पोटाचा एक्सरे काढला असता, त्यांना गंभीर इन्फेक्शन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, रत्नागिरी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक ०९/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे) केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 23-06-2025













