नाटे : राजापूर तालुक्यातील नाणार येथील एका आंब्याच्या बागेत साफसफाईचे काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा तापामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मनीष गोपी स्वांसी (वय १९, रा. लटुली ससानबेरा, झारखंड) असे या तरुणाचे नाव असून, १५ जून रोजी सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी २१ जून रोजी सायंकाळी ७.५० वाजता नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक १८/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे) करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष स्वांसी हा नाणार येथील समीर प्रभुदेसाई यांच्या आंब्याच्या बागेत साफसफाई आणि देखभालीसाठी आला होता. बागेतील काम पूर्ण झाल्यानंतर त्याला ताप येऊ लागला. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते आणि तो राहत्या ठिकाणी आराम करत होता. दरम्यान, त्याचा चुलत भाऊ जेवियर याने समीर प्रभुदेसाई यांना माहिती दिली की, मनीषला खूप ताप येत असून तो मोठ्याने ओरडत आहे, तरी तुम्ही तात्काळ या.
त्यानंतर समीर प्रभुदेसाई यांनी घटनास्थळी जाऊन मनीषची पाहणी केली. मनीषला त्याचे नातेवाईक आणि बागेतील कामगारांसोवेत तातडीने रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मनीष गोपी स्वांसी यास मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 23-06-2025













