दापोली : दापोली तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे एका सेवानिवृत्त ऑर्डिनरी कॅप्टनच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण आणि शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी फिर्यादीच्या विहिरीच्या बांधकामात सुरुंग लावण्याला एक वर्षापूर्वी विरोध दर्शविल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. २२ जून रोजी सकाळी ६.४५ वाजता ही घटना घडली असून, त्याच दिवशी रात्री ७.३६ वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदेश केशव चिपळुणकर (वय ५७, रा. करजगाव चिपळुणकरवाडी, ता. दापोली) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये प्रसाद चंद्रकांत धयाळकर (मूळ रा. करजगाव चिपळुणकरवाडी, सध्या रा. मुंबई) आणि त्याच्यासोबत तीन महिला आरोपींचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद धयाळकर याला त्याच्या विहिरीच्या बांधकामात सुरुंग लावायचा होता, ज्याला फिर्यादी सुदेश चिपळुणकर यांनी सुमारे एक वर्षापूर्वी विरोध केला होता. याच जुन्या रागातून २२ जून रोजी सकाळी आरोपींनी सुदेश चिपळुणकर यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. घरात घुसून त्यांनी फिर्यादी सुदेश चिपळुणकर, त्यांची आई आणि पत्नी यांना हाताने मारहाण केली. तसेच त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी दापोली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १८९(२), १९१(१), १९०, ११५(२), ३३२(ग), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा (गु.र.नं. ११७/२०२५) दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 23-06-2025













