लांजा : विकास आराखड्याबाबत तीन सदस्यीय समिती स्थापन

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला लांजा व कुवे येथील नागरिकांचा विरोध आहे. याबाबत नागरिकांनी नगरपंचायतीकडे हरकती दाखल केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारक विभागाकडून तीन सदस्य असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियोजन समिती गठित केली आहे.

लांजा नगरपंचायत प्रशासनाने विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) जाहीर करताना प्रथम येथील लोकांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन तसेच त्या परिसरातील भौगोलिक परिस्थितीची पाहणी व अभ्यास करूनच जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता हा आराखडा नागरिकांना गृहीत धरून जाहीर करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या आराखड्यात असंख्य त्रुटी आहेत. त्यामुळे भविष्यात आर्थिक नुकसानीसह जमिनी, घरांचे मोठे नुकसान होणार आहे.

आराखड्यात दाखविण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांमुळे अनेकांची घरे तुटणार आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाचे संचालक डॉ. प्रतिभा भदाणे यांनी तीन सदस्य असलेली समिती नेमली आहे. या समितीमध्ये नगर आणि प्रदेश रचना किंवा पर्यावरण किंवा दोन्हीशी संबंधित असणाऱ्या बाबींचे विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या तीन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये नगररचना विभागाचे सेवानिवृत्त सहायक संचालक मिलिंद आवडे, सेवानिवृत्त नगर रचनाकार शिवप्रसाद धुपकर आणि सेवानिवृत्त नगररचनाकार चंद्रशेखर तायशेटे यांचा समावेश आहे.

लांजा प्रारूप विकास आराखडा योजनेसंदर्भात नागरिकांच्या हरकती, असलेला विरोध लक्षात घेऊन या समस्यांचे निराकरण करणे, लोकांचा विरोध लक्षात घेऊन त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे आणि त्यानंतर शहराच्या विकास आराखडा योजनेला अंतिम मंजुरी देणे याबाबत ही समिती काम पाहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 23/Jun/2025