“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो” : भास्कर जाधव

Bhaskar Jadhav News: विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता ठाकरे गटाला पडत असलेले खिंडार दिवसेंदिवस अधिकच मोठे होताना पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटानंतर आता भाजपामध्ये माजी नगरसेवक, पदाधिकारी, नेते प्रवेश करताना दिसत आहेत.

तर ठाकरे गटातील काही विद्यमान आमदारांना शिवसेना शिंदे गटाकडून खुली ऑफर दिली जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंग असते. अशातच ठाकरे गटाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी निवृत्तीची भाषा केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचे म्हटले जात आहे.

पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव यांनी आपली खदखद व्यक्त केली. तसेच मंत्रिपद न मिळाल्याबाबतही खंत व्यक्त केली. मला शिवसेना पक्षात भाषणे करायची संधी मिळते, तसेच पक्षाच्या हितासाठी मी जे करायचे ते करतो. पण, मी कुणाची हुजरेगिरी कर नाहीत, हा ला हा किंवा ना ला ना… असे म्हणणारा कार्यकर्ता आहे. शिवसेनेचा शाखाप्रमुखच हाच शिवसेनेचा कणा होता, पण कुठेतरी शिवसेनेत शाखाप्रमुखच बाजूला होत असल्याचे मला दिसले, म्हणून त्याच अनुषंगाने शिवेसना पक्षाच्यावतीने शिबिराचे आयोजन केले होते, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

३९ जागांपैकी एकटा निवडून आलोय, ८ वेळा निवडणुका जिंकल्यात

कार्यकर्ते कमी होत आहे, म्हणून निवृत्ती घ्यायचे काहीच कारण नाही. ३९ जागांपैकी मी एकटा निवडून आलो आहे. शेवटी आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की, आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळे कारण नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, आपल्याला मंत्रि‍पदाची संधी मिळाली नाही. मला मंत्रिपद का दिले नाही याचे उत्तर कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावे. माझ्यावर झालेला अन्याय उघडपणे सांगितला, यापुढेही सांगेन, असे भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, मी तेव्हा बोललो. मी आजही बोलेन. उद्याही बोलेन. मला मंत्रिपद का मिळायला नको, हे मला कोणी सांगायला हवे. मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काय रडत बसायचा का? उलट लढायचे. मला मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून जे फुटून गेले त्यांच्याबरोबरही मी गेलो नाही. मी लढत आहे, असे भास्कर जाधव यांनी नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 23-06-2025