सावर्डे : कुंभारखाणी बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील ग्रामोत्कर्ष संघाने माध्यमिक विद्यामंदिरमध्ये दहावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला २१ हजारांचे बक्षीस ठेवले आहे. यंदा हे बक्षीस मुरडव येथील शमिका मेणे हिने ९०.८० टक्के गुण मिळवून पटकावले. शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांच्या हस्ते तिला हे बक्षीस देण्यात आले. (कै.) शंकरराव सुर्वे (दादासाहेब) यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या बक्षिसाचे हे नववे वर्ष आहे. विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात छोटा शिशु ते दहावी अखेर गुणानुक्रमे प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या वेळी संस्था कार्यकारिणी सदस्य सचिन सुर्वे, सरपंच वंदना सुर्वे, उपसरपंच अनिल सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते विकास सुर्वे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश गुरव, शलाकाताई सुर्वे, केशव शितप, मुख्याध्यापक विलास जाधव उपस्थित होते.
प्रभाकर विष्णुपंत सुर्वे यांच्या स्मरणार्थ उमेश सुर्वे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे ११ हजाराचे पारितोषिक साक्षी कदमला, (कै.) नारायणराव सुर्वे यांच्या स्मरणार्थ संस्थाध्यक्ष संतोष सुर्वे यांच्याकडून ५ हजाराचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शमिका साळवी हिला देण्यात आले. माजी विद्यार्थिनी तन्वी सुर्वे हिची पॉवरलिफ्टिंगसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विकास सुर्वे व शलाका सुर्वे यांनी दहावीत ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार पाचशे रुपयांचे पारितोषिक दिले. इंग्रजी व सामाजिक शास्त्र या विषयात ९० पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (कै.) आनंदीबाई पवार व (कै.) राहुल पवार यांच्या स्मरणार्थ दिनेश पवार यांनी रोख पारितोषिक देऊन गौरविले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 23/Jun/2025













