गुहागर : तालुक्यातील वडद गणपतवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री एका बिबट्याने चक्क घराच्या खिडकीची काच फोडून आत प्रवेश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वडद गणपतवाडी येथील पूजा चंद्रकांत शिंदे यांच्या बंद घरात मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पूजा शिंदे या शेजारील घरात झोपायला गेल्या होत्या. मध्यरात्री अचानक मोठा आवाज आल्याने त्या जाग्या झाल्या आणि घराबाहेर येऊन पाहिले असता, त्यांना आपल्या घराच्या खिडकीतून बिबट्या बाहेर पडताना दिसला. बिबट्याने खिडकीची काच फोडून घरात प्रवेश केला होता. सुदैवाने, घटनेच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
या घटनेची माहिती मिळताच उपसरपंच संदीप धनावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भरवस्तीत बिबट्याचा थेट घरात शिरकाव झाल्याने ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले आहेत. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 23/Jun/2025













