रत्नागिरी : बनावट कागदपत्रे तयार करून ७० लाख रुपये किमतीच्या चार आलिशान मोटारींची परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश रामचंद्र सुर्वे (वय ३३, रा. खेडी, शिवाजीनगर, चिपळूण) आणि हसन मगदूम जहागीरदार (वय ३१, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सागर हरी देसाई (वय ३८, रा. टेंबलाईवाडी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर देसाई हे कमिशन बेसिसवर मोटारींची विक्री करतात. त्यांनी त्यांच्या मालकीच्या चार आलिशान मोटारी विक्री करण्यासाठी संजय हवालदार (कळंबा), नीलेश सुर्वे आणि हसन मगदूम यांच्याकडे दिल्या होत्या. या मोटारींच्या विक्रीतून २ लाख रुपये कमिशन देण्याचे हवालदार आणि इतरांनी कबूल केले होते.
एप्रिल २०२४ ते मे २०२४ या कालावधीत आरोपींनी या मोटारी ताब्यात घेतल्या. परंतु, त्यांनी फिर्यादीला कोणताही मोबदला दिला नाही. त्याऐवजी, आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून या चारही मोटारींची परस्पर विक्री महंमद हाजी (छत्रपती संभाजीनगर) आणि मनीष फुके (नागपूर) यांना केली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर आपली ७० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे सागर देसाई यांच्या निदर्शनास आले. त्यांनी २२ मे २०२५ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत रत्नागिरीतील या दोन एजंट्सना अटक केली आहे. पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:15 23-06-2025













