रत्नागिरी : ध्यान केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
श्री. सामंत यांनी येथील शासकीय विश्रामगृहात विविध विभागांचा आढावा घेतला.
त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्र. प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, प्रांताधिकारी जीवन देसाई, राहुल पंडित, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
यावेळी मंडणगड न्यायालयीन इमारत बांधकामबाबत सुरू असलेल्या कामाची माहिती अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, चिपळूणचे कार्यकारी अभियंता अमरजित रामसे, उपअभियंता जनक धोत्रेकर आदी संबंधित उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सुरुवातीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा आढावा घेतला. प्रकल्प संचालक जाधव यांनी रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना या योजनांमधील उद्दिष्ट, मंजूर प्रकरणे, देण्यात येणारा हप्ता, योजनेंतर्गत पूर्ण घरे, अपूर्ण घरे आदींची सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री म्हणाले, घरकुल योजनेचा लाभ देत असताना नागरिकांना ज्या अडचणी येतात, त्या सोडविण्यासाठी काम करा. काही कारणास्तव ज्यांची प्रकरणे नामंजूर होतात, त्यांना पत्राने कळवावे. घरकुल आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात चांगले काम होत आहे. सरकार करीत असलेले हे काम जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. जिल्हा दौऱ्यावर असताना या योजनेतून बांधण्यात आलेली घरे दाखवावीत.
नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या 5 हाऊस बोट, टुरिस्ट बस, महिला बचत भवनबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, ज्या ठिकाणी पर्यटकांना येणे-जाणे सोयीचे आहे, अशा ठिकाणी हाऊस बोट ठेवाव्यात. हाऊस बोटी चालविण्याबाबत प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे. हाऊस बोटीसंदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. महिलांना आवश्यकतेनुसार आणखी टुरिस्ट बस उपलब्ध करून देता येतील.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले, एसटी बसेस नियमित वेळापत्रकानुसार सुटतील याची दक्षता घ्या. शाळा सुटण्याच्या वेळेला बसेस सोडा. यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी माहिती दिली.
पालकमंत्र्यांनी होर्डिंग्जसंदर्भात आढावा घेतला. अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगसंदर्भात मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी माहिती दिली. शहरातील होर्डिंग्जची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी यांनी समन्वय साधावा. यामध्ये होर्डिंग मालकांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. याबाबत लवकरच आढावा घेऊ, असेही ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 24-06-2025













