लांजा तालुक्यात विजेचा खेळखंडोबा

लांजा : ग्राहकांकडून वीजबिल वसुलीसाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या महावितरण विभागाला वीजपुरवठा सुरळीत ठेवणे अवघड जात आहे. शहरासह तालुक्यात विजेच्या लपंडावाने जनता त्रस्त झाली आहे. याचा परिणाम विद्यार्थी, व्यापारी, शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, पाणीपुरवठा आणि इलेक्ट्रॉनिक उपरणे या सर्वांवर होत असून, याबाबत महावितरण विभागाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

शहरासह तालुक्यात दिवसरात्र विजेचा लपंडाव सुरू असतो. याचा मोठा फटका व्यापारीवर्गाला बसतो तसेच वीजपुरवठा सतत खंडित झाल्याने नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत असतात. विजेच्या सततच्या येण्या-जाण्याच्या खेळामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे बिघडण्याचे प्रमाण वाढले असून, सर्वसामान्य जनतेला यामुळे आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो.

पाऊस सुरू असताना काही नैसर्गिक आपत्तीमुळे वीजपुरवठा खंडित होतो; परंतु पाऊस नसताना सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने याबाबत महावितरण कार्यालयात विचारणा केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नाहीत तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकारदेखील तालुक्यात काही ठिकाणी घडले आहेत. त्यामुळे चार-चार दिवस अंधारात राहण्याची वेळ संबंधित नागरिकांवर आली.

शैक्षणिक वर्षे सुरू झाल्याने विविध दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयातही कामेदेखील विजेवर अवलंबून असतात; परंतु सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने होणारी कामे तासनतास रखडली आहेत. त्यामुळे नागरिकांना ताटकळत राहावे लागते.

तालुक्यातील वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने येथील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे महावितरण विभागाला जागे करण्यासाठी आम्हाला आता शिवसेना स्टाईलने धडक द्यावी लागेल- सुरेश करंबळे, तालुकाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 24/Jun/2025