संगमेश्वर : तालुक्यातील गोळवली, धामणी पंचक्रोशीतील बारा गावातील शेतकरी पुरिया खताच्या तुटवडयामुळे चिंतेत आहेत. जर तातडीने खताचा पुरवठा झाला नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही आंदोलनाचा मार्ग पत्करू, प्रशासनाने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असा इशारा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी दिला आहे.
भातशेतीला समाधानकारक वातावरण असल्यामुळे संगमेश्वर तालुक्यात सध्या भातलावणीच्या कामांना सुरवात झालेली आहे; मात्र खत वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे. संगमेश्वर तालुक्याला सुमारे ३० टन पुरिया खत आवश्यक असते; परंतु तेवढे खत आलेले नाही. त्यामुळे शेतकरी खताच्या प्रतीक्षेत असून, तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांची बाजू घेण्यासाठी ठाकरे शिवसेनेकडून पावले उचलण्यात आली आहेत. याबाबत घेराडे म्हणाले, स्थानिक प्रशासनाने खताच्या पुरवठ्याबाबात योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.
खताच्या तुटवड्याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास त्याचा थेट परिणाम भातलावणीवर होईल, भात उत्पादन घटण्याचाही धोका आहे. भातशेतीवर अनेक कुटुंबांचे जगणे अवलंबून असते. त्यामुळे खात मिळाले नाही तर शेती कशी करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. स्थानिक शेतकरी संघटनांनी या मुद्दयावर आवाज उठवण्याची तयारी सुरू केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 24/Jun/2025














