गुहागर-विजापूर महामार्गाचा अंतिम निवाडा मंजूर

गुहागर : भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये अडकलेल्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातून जाणाऱ्या मुख्य नाका ते १५०० मिटरपर्यंतच्या जागेचा अंतिम निवाडा मंजूर झाला आहे. १०० खातेदारांना मोबदला वाटपासाठीच्या नोटिसीचे वितरण सुरू झाले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गामधील गुहागर शहरातील पहिली भूसंपादन प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे.

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आतापर्यंतचे रामपूर ते गुहागर शासकीय विश्रामधामपर्यंत काँक्रिटचे बहुतांशी काम झाले आहे; मात्र काम करण्यापूर्वी यापैकी एकाही जागेचे रितसर भूसंपादन केले नव्हते; मात्र, शहरातील रस्ता रुंदीकरण करताना प्रथम भूसंपादन करा त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करा, असा पवित्रा येथील रस्त्यासाठी जागा जाणाऱ्या खातेदारांनी घेतला होता. भूसंपादनाच्या या मागणीची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला तब्बल चार वर्षे लागली. तरीही अजून ३०० मीटरच्या जागेची कोणतीच भूसंपादन प्रक्रिया झालेली नाही. गुहागर शहरनाक्यावरील श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानशेजारील दुकानांचा प्रश्न ऐरणीवर होता.

यामुळे सुरवातीला रस्ता रुंदीकरण एसटी स्टँडपर्यंतच होणार, असेही बोलले जात होते; मात्र भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता येथील जागा मोकळी होणार आहे. मुख्य शहरनाका ते १५०० मीटरपर्यंतच्या भूसंपादन प्रक्रियेमुळे रस्त्याच्या कामाला गती निर्माण होणार आहे. दरम्यान, १०० खातेदारांना ३ कोटी ३६ लाख ७६ हजार ६११ एवढ्या रकमेचा अंतिम निवाडा मंजूर केला आहे. त्या-त्या खातेदाराला त्या जमिनीचे वाटपाची नोटीस देऊन अहवाल आपल्या कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी केला आहे.

या दिलेल्या मोबदल्यामध्ये नक्की दर किती दिला आहे, याचा उलगडा होत नाही. दिलेल्या मोबदल्यामध्ये जागेची व इमारतीची किती रक्कम याचाही उलगडा होत नाही. यामुळे मोबदला स्वीकारणारे खातेदार आता यावर कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे; मात्र अखेर शहरातील भूसंपादनामधील अंतिम निवाडा मोबदल्याच्या नव्या धोरणानुसारच झाला पाहावयास मिळत आहे. असल्याचे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 24/Jun/2025