रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय आणि बचाव केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कंपाउंडचे काम पूर्ण झाले असून, पावसाळ्यानंतर कामाला आणखी वेग येणार आहे. या संग्रहालयात चार बंगाली वाघ आणि दोन पाणघोडे (हिप्पोपोटॅमस) यांसारख्या प्रमुख प्रजातींसह विविध प्रकारचे प्राणी पाहायला मिळणार आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांचा ड्रीम प्रोजेक्ट
हा प्रकल्प जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून, रत्नागिरीला हापूस आंबा आणि पर्यटनासोबतच जैवविविधतेसाठीही एक महत्त्वाचे केंद्र बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. बिल्हा परिषद आणि वनविभागामार्फत हे काम केले जाणार असून, एमआयडीसीकडून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
- विस्तृत क्षेत्रफळ: हे प्राणी संग्रहालय १५.४९ हेक्टर (सुमारे ३८ एकर) खासगी जमिनीवर विस्तारलेले आहे.
- प्रजातींची विविधता: येथे बंगाली वाघ (१७५० चौ. मी. क्षेत्रफळ), पाणघोडे (१७७० चौ. मी. क्षेत्रफळ), भारतीय मांसाहारी, शाकाहारी, कॅनिडी, माकडे, निशाचर प्राणी, सरपटणारे प्राणी, गोड्या पाण्यातील मासे, तसेच विविध परदेशी प्रजातींचा समावेश असेल.
- प्रजाती निवडीचे निकष: एकूण प्राण्यांच्या प्रजातींपैकी ६०% स्थानिक परिसंस्थेतील, २०% प्रादेशिक, १०% राष्ट्रीय आणि १०% परदेशी प्रजाती असतील.
- दीर्घकालीन विकास योजना: पुढील २० वर्षांसाठी (२०२२-२०४४) या प्रकल्पाची विकास दिशा निश्चित करण्यात आली असून, दर १० वर्षांनी याचे पुनरावलोकन केले जाईल.
- अद्ययावत सुविधा: प्राणी स्वयंपाकघर, चारा साठवण, पशुवैद्यकीय दवाखाना, पुनर्वसन केंद्र, विलगीकरण कक्ष, इन्सिनरेटर यांसारख्या सुविधा येथे उपलब्ध असतील.
- पर्यावरणपूरक डिझाइन: मालगुंड परिसरातील प्रदूषण टाळण्यासाठी प्राण्यांचे निवासस्थान रस्त्यापासून दूर प्रस्तावित केले आहे.
५१ कोटींचे भव्य अंदाजपत्रक
या प्रस्तावित प्राणी संग्रहालय आणि बचाव केंद्रासाठी सुमारे ५१ कोटी ६ लाख ८० हजार रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे. यामध्ये प्राणीनिवास, पायाभूत सुविधा, विद्युत आणि पाणीव्यवस्था, सुरक्षा, कर्मचारी निवास, पशुवैद्यकीय सुविधा, शिक्षण व जागृती केंद्र, बागबगीचा, वाहने, देखभाल व इतर घटक समाविष्ट आहेत.
मालगुंड ग्रामपंचायतीची सहमती
मालगुंड ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०२२ रोजी ग्रामसभेत ठराव करून प्राणी संग्रहालय स्थापन करण्यास सहमती दर्शवली होती आणि ५० एकर खासगी जमीन देण्याचे निश्चित केले होते. गणपतीपुळे या प्रसिद्ध पर्यटनस्थळापासून केवळ ६ किमी अंतरावर असल्यामुळे पर्यटकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
वनविभागाकडून जीन्सिस कन्सल्टंटचे जितेंद्र सिंग यांची सविस्तर प्रकल्प अहवाल व मास्टर लेआउट प्लॅन तयार करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सेंट्रल झू ऑथॉरिटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तांत्रिकदृष्ट्या शक्य आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य प्रकल्प तयार करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
हा प्रकल्प रत्नागिरीच्या पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 24-06-2025














