खेडशी देहव्यापार प्रकरण : ७ दिवसांत ८६ गिऱ्हाईक, मुख्य संशयित सलमान मुकादम अजूनही फरार

रत्नागिरी, ता. २३ : रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील देहव्यापार प्रकरणात पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकला होता, तिथे केवळ सात दिवसांत तब्बल ८६ गिऱ्हाईक येऊन गेल्याचे उघड झाले आहे. प्रत्येक गिऱ्हाईकाकडून घेण्यात आलेली अर्धी रक्कम देहव्यापार करणाऱ्या महिलांना दिली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे १३ मे रोजी रात्री उशिरा ही कारवाई करत या देहव्यापाराचा पर्दाफाश केला होता. यावेळी पोलिसांनी देहव्यापार करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेतले. यातील दोन महिला गुजरातच्या, एक मुंबईची तर एक कर्नाटकची रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पोट भरण्यासाठी हा व्यवसाय करत असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे.

या प्रकरणात अनैतिक व्यापार करणाऱ्या अरमान करीम खान (रा. कोकणनगर रत्नागिरी) यांच्यासह तीन संशयितांविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ कायद्यांतर्गत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य संशयित सलमान मुकादम हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 24-06-2025