कामथे नदीत प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

चिपळूण : कामथे हरेकरवाडी नदीत रसायनमिश्रित प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने काल प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांकडे केली. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास झाला नाही, तर शिवसेना आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शनिवारी (ता. २१) रात्री मुंबई-गोवा महामार्गावर कामथे हरेकरवाडी नदीत रसायनमिश्रीत पाणी सोडताना पाच टँकर आढळले. स्थानिक नागरिकांनी दोन टँकर पकडले. उर्वरित तीन टैंकर प्रसार झाले. पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आणि दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत; मात्र काल शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शिवसेना सचिव संभाजी खेडेकर, शिवसेना विभागप्रमुख राम डिगे, उपशहरप्रमुख भैया कदम, उपतालुकाप्रमुख युवा सेना संजय चांदे, पार्थ जागुष्टे युवा सेना शहरप्रमुख, युवासेना विभागप्रमुख राहुल भोसले यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी उत्कर्ष शिंगारे आणि प्रदीप कुलकर्णी यांची भेट घेतली.

ज्या कंपनीने हे पाणी सोडले आहे त्या कंपनीवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. पोलिसांनी दोन टँकर जप्त केले आहेत. त्या टँकरच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात करण यावा, अशी मागणी करण्यात आली.

प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसखात्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची हमी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या त्या कंपनीवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल- उमेश खाताते, युवासेनेचे तालुकाप्रमुख

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 24/Jun/2025