गावतळे : देवरहाटीत क आणि ब वर्ग पर्यटनमधील निधी वापरू शकत नाही. त्यावर काय मार्ग काढता येईल, यासाठी संबंधित विभागाकडून अहवाल मागितलेला आहे. या सर्व समस्यांमधून देवरहाट बाहेर पडली पाहिजे आणि मंदिरांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, म्हणून प्रयत्न सुरू आहेत, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
गावतळे येथील श्रीकृपा मंगल कार्यालयात पंधरा गाव पंचक्रोशी ब्राह्मण समाजातर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. योगेश कदम म्हणाले, मी सत्कार समारंभ करण्यापेक्षा विकासाला प्राधान्य देतो. मागील ५ वर्षात उत्तम काम करू शकलो, त्यामुळे पहिल्यापेक्षा दुसऱ्यावेळी मताधिक्य जास्त होते. २०१९ रोजी महाराष्ट्राने अभद्र आघाडी पाहिली. मी लहान असताना बाळासाहेबांनी नारा दिला होता, “गर्व से कहो हम हिंदू है. हा विचार राजकारणात आल्यावर गावेगावी पोचविला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ रोजी जो निर्णय घेतला, त्यावेळी आदित्य ठाकरे यांना फोन करून माझा निर्णय मी सांगितला. मगच शिंदे यांच्याबरोबर गेलो. हा निर्णय जनतेनेही स्वीकारला होता.
जनता विकासकामांच्या आणि हिंदुत्वाच्या पाठीशी उभी राहते. मतदारसंघात मोठी एमआयडीसी आणायची आहे. तरुणांना रोजगार द्यायचा आहे. मंडणगड येथे ६०० एकरमध्ये एमआयडीसी आपण आणत आहोत. कार्यक्रमाला १५ गाव ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष कुमार बर्वे, किशोर देसाई, विधी पवार, प्रकाश कालेकर, अप्पा पेठे, राम बर्वे, वैद्यही गोंधळेकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 24/Jun/2025














