पावस : ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याचा आक्षेप घेत रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील सरपंच श्रावणी विक्रांत रांगणकर यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. पावस परिसरातील ही पहिलीच घटना असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गणेशगुळे ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच निवडणुकीमध्ये श्रावणी रांगणकर निवडून आल्या होत्या. त्या निवडणुकीमध्ये सात जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळी सातही जागेवरती एकाच विचाराचे पॅनल निवडून आले होते. सरपंचपदी निवडून आल्यानंतर कारभार महिला सरपंचांच्या हाती असल्याने त्यांनीच सदस्यांच्या माध्यमातून गावची विकासकामे सर्वांच्या संमतीने करायचा ठराव त्यावेळी करण्यात आला होता: परंतु कारभार करत असताना सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची सदस्यांची तक्रार आहे.
ग्रामसभेत सुद्धा सरपंच यांच्या पतीचा हस्तक्षेप वाढत असल्यामुळे ग्रामस्थांनी याबाबत सरपंच यांच्या पतीला समज दिली होती, अशी यांनी दिली. त्यानंतर सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीचा कारभार हाकण्यात यावा, असे ठरवण्यात आले; मात्र प्रत्यक्षात सदस्यांना कोणत्याही कामकाजामध्ये विश्वासात न घेता दोन वर्ष कारभार केला जात होता. उपसरपंच प्रसाद तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सरपंच श्रावणी रांगणेकर यांच्या कारभाराविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला आहे.
गाव विकासासाठी एकमताने ग्रामपंचायतीत पॅनल निवडून आणले. सर्वांनी एकत्रितरीत्या समन्वयाने काम करण्याचे ठरले होते: मात्र प्रत्यक्षात सरपंच यांनी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्यामुळे गावच्या विकासाला खीळ बसत असत्यामुळेच हा निर्णय सदस्यांनी एकमताने घेतला आहे- प्रसाद तोडणकर, उपसरपंच
गणेशगुळे सरपंचाविरोधात माझ्याकडे अविश्वास ठराव आला आहे. सदस्यांना विश्वासात घेत नाही, असा त्यांच ठराव करणाऱ्यांचे मत आहे. यावर सोमवारी (ता. ३०) ग्रामपंचायतीत सुनावणी घेण्यात येणार आहे. – राजाराम म्हात्रे, तहसीलदार रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 26/Jun/2025













