मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
2019 च्या विधानसभेला कोणाचे किती जागांवर वर्चस्व?
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. पण यंदा हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या आणि काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.
महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय चित्र काय?
2019 मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेच्या 40 आमदारांसह पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत बंड करत महायुतीत सहभागी झाले. यानंतर या दोघांनीही थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला. यामुळे राज्याच्या राजकारणाला हादरे बसले होते.
महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019 पक्षीय बलाबल काय?
भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13
एकूण – 288
दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरु होणार
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकांची धामधुम सुरु होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 15-10-2024