रत्नागिरी : वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये ५ लाखांचा टप्पा गाठला आहे. या योजनेत सोमवारपर्यंत (दि.३०) सहभागी झालेल्या ५ लाख ३ हजार ७९५ वीजग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी होण्याची ऑनलाइन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाइल अॅप व www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वार्षिक १२० रुपयांचा फायदा महावितरणकडून पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजनेतून वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. कागदी बिलाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे.
वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला राज्यात प्रतिसाद वाढत आहे. या योजनेत आतापर्यंत ५ लाख ३ हजार ७९५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना ६ कोटी ४ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. कोकणातील १ लाख १३ हजार २५४ ग्राहक या योजनेत सहभागी झाले असून, त्यांना १ कोटी ३६ लाख रुपयांचा वार्षिक फायदा झाला आहे. ग्राहकांना नोंदणीकृत ‘ई-मेल’वर व मोबाइलवर ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येते. वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्क्याची सवलत दिली जाते. त्यासाठीही वीजबिल तत्काळ ऑनलाइनद्वारे भरणे सोयीचे झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:19 PM 01/Jul/2025













