रत्नागिरीमध्ये बाळासाहेब खेर यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र आणि मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री, पहिल्या पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी (कै.) बाळासाहेब खेर यांनी केलेले विविध क्षेत्रांतील अफाट कार्य पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत ठरणारे आहे. त्यांचे कार्य व्यक्तीच्या जीवनाला दिशा देणारे व समृद्ध करणारे असे आहे. ते रत्नागिरीचे रत्न होते; परंतु आजपर्यंत रत्नागिरीमध्ये त्यांचे यथोचित स्मारक आजही उभे राहिलेले नाही. हे स्मारक उभे व्हावे, अशी मागणी स्मारक समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन राज्याचे उद्योग, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्याकडे नुकतेच देण्यात आले. पालकमंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेऊ, असे आश्वस्त केले आहे. ब्रिटिशकालीन बॉम्बे प्रांताचे (ज्यामध्ये महाराष्ट्र व गुजरात यांचा समावेश होता.) ते १९३७ ते १९३९ असे दोन वर्षे पहिले (पंतप्रधान) मुख्यमंत्री होते. याच काळात बाळासाहेब खेर शिक्षणमंत्री होते. बाळासाहेबांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. महात्मा गांधीजींचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे मिठाच्या सत्याग्रहाच्या सविनय कायदेभंगाच्या मोहिमेतील सहभागामुळे त्यांना १३ महिन्यांचा कारावास झाला. १९४२च्या चलेजाव आंदोलनात सहभाग असल्याने त्यांना दोन वर्षे सश्रम कारावासही भोगावा लागला.

त्यांनी शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षण विषय सक्तीचा केला. भारतातील एकमेव महिला विद्यापीठाला (एसएनडीटी) कायदेशीर शासकीय मान्यता दिली. तसेच ते स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री व स्वातंत्र्यानंतरही पाच वर्षे पहिले मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री व गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष होते. स्मारक समितीमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ, कोषाध्यक्ष सुरेश पावसकर, माजी जि. प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी आमदार बाळ माने, श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते व ट्रस्टचे अध्यक्ष संदीप ढवळ, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अॅड. राजशेखर मलुष्टे, सतीश कामत, मकरंद पटवर्धन यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 04/Jul/2025