लांजा : कोणावरही अन्याय न करता प्रशासकीय यंत्रणेकडून शहराचा विकास आराखडा राबवला जातो आहे; मात्र लांजा शहराच्या जनतेला चुकीची माहिती देऊन संभ्रम करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम लांजा तालुका काँग्रेस करत आहे, असा प्रतिहल्ला नगरपंचायतीचे तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी पत्रकार परिषदेत केला.
लांजा तालुका काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवकांवर आराखड्याबाबत घणाघाती आरोप केले होते. आराखडा जनतेसमोर ठेवला असता तर आजची वादाची परिस्थिती उद्भवली नसती. त्याला प्रत्युत्तर म्हणून लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनोहर बाईत व नगरसेवक एकवटले.
मनोहर बाईत यांनी सांगितले, अनेकवेळा सभा बोलावून त्यामध्ये आराखड्याबाबत चर्चा झाली. शहराच्या प्रत्येक प्रभागानुसार पाहणी करून नागरिकांशी चर्चा करून त्यानंतरच प्रशासकीय बाबी पूर्ण करून आराखडा राबवला जातो आहे. याबाबत आमदार किरण सामंत यांनीही लक्ष घातले आहे. कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने आराखडा केला आहे. विनाकारण लोकांमध्ये चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण केला जात आहे; मात्र लोकांनी काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता शहराच्या विकासासाठी एकत्र यावे. पत्रकार परिषदेला नगरसेवक सचिन डोंगरकर, समृद्धी गुरव, मधुरा लांजेकर, शीतल सावंत, मधुरा बापेरकर, दूर्वा भाईशेट्ये आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 05/Jul/2025












