रत्नागिरी : समांतर वीज परवाना अंतर्गत महाराष्ट्राच्या वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात दि. ९ जुलै रोजी महावितरण कर्मचारी, अधिकारी, अभियंता कृती समितीने राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपन्यातील अधिकारी, कर्मचारी, अभियंता या संपात समांतर वीज परवाना हे धोरण महावितरणनेही मान्य करून मुंबई शहर, भाईंदर महानगरपालिका क्षेत्राकरिता समांतर वीज परवान्याचा अर्ज आयोगाकडे सादर केला आहे. केंद्र व राज्य सरकारने देशांतील उर्जा उद्योग कार्पोरेट घराणे व खासगी भांडवलदार कंपन्यांना सोपवण्याचे षडयंत्र आखले असून ऊर्जा उद्योगाच्या खासगीकरणाविरुद्ध देशातील कामगार, अभियंत्रे अधिकाऱ्यांच्या संघटनांनी दि ९ जुलै रोजी एक दिवस संपाची हाक दिली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या या धोरणाविरुद्ध उत्तर प्रदेशातील भारतीय मजदूर संघटनेसह (बी. एम. एस.) सर्व कर्मचारी, डिप्लोमा होल्डर इंजिनिअर्सची संघटना, सर्व अभियंत्यांची ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशन व कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या संघटना गेले २१९ दिवस लढत आहेत. अशा आंदोलनकारी क्रांतिकारी चळवळीला सलाम करण्यासाठी दि. ९ जुलै रोजीच्या संपात सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे.
देशभरात केवळ वीज कर्मचाऱ्यांचा हा संप नाही तर देशभरातील सर्व सार्वजनिक उद्योगातील बँक, एल.आय.सी., जी.आय.सी., कोळसा, स्टील ऑइल, केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचारी, पोस्ट अँड टेलिग्राफ या सर्वच क्षेत्रातील संघटना या संपात सहभागी होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 05/Jul/2025














