Maharashtra Weather Updates : राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु.. कोकणात आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

मुंबई : Maharashtra Weather Updates : मान्सून माघारी परतल्यानंतरही देशातील अनेक भागात पावसाचा वेग थांबलेला नाही. त्यामुळे आज राज्यात काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रासह देशातून पुढे सरकत आहे.

मान्सून परतल्यानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.

IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, आज (१६ ऑक्टोबर) रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यात तापमानात चढ – उतार सुरू आहे. त्यामुळे आज कुठे पावसाची शक्यता आहे तर कुठे तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे राज्यात आज ऊन- पावसाचा खेळ रंगणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. याशिवाय, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ऊन- पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मराठवाड्यातील हवामान

मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, मळणी केलेल्या सोयाबीनला उन्हात वाळवूनच साठवणूक करावी.

तापमानात कहीश्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे, जनावरांच्या गोठ्याच्या छतावर साळीचे गवत किंवा स्प्रींकलरची व्यवस्था करावी, जेणेकरून गोठ्याच्या आतील तापमानात घट होईल. जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 16-10-2024