‘शोभिवंत मत्स्य शेतीतील उद्योजगता विकास: समस्या आणि उपाय’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी: दरवर्षी १० जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था, रत्नागिरी आणि मत्स्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १७.३० पर्यत ‘शोभिवंत मत्स्य शेतीतील उद्योजगता विकास: समस्या आणि उपाय’ या विषयावर राज्य-स्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.

महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव-कर्नाटकातील २०० शोभिवंत मत्स्य शेतक-यांनी या कार्यशाळेत उस्त्फुर्द सहभाग घेतला.

कार्यशाळेचे उद्घाटन मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ अ. सा. पावसे, रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्थेचे अध्यक्ष फह्द जमादार, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ केतन चौधरी, मत्स्य जल शास्त्र आणि जीव शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ पागारकर, मिरकरवाडा मत्स्य व्यवसाय प्राधिकरणच्या मत्स्य विकास अधिकारी अक्षया मयेकर, वरिष्ठ शोभिवंत मत्स्य शेतकरी आणि हंस अक़्वाकल्चर रोहाचे हसन मसलाई, मत्स्य विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ द. इ. पठाण आणि इतर मान्यवर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. उद्घाटन कार्यक्रमात प्रास्ताविक डॉ द. इ. पठाण, प्राध्यापक व विभाग प्रमुख मत्स्य संपत्ती अर्थशास्त्र आणि विस्तार शिक्षण विभाग यांनी केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अ. सा. पावसे यांनी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था हा अत्यंत चांगला उपक्रम असून, त्याद्वारे संघटीत होवून व्यावासायिक प्रगती करणे शक्य असल्याचे सांगितले. मत्स्य शेतकरी अशा पद्धतीने एकत्रित येणार असल्यास महाविद्यालय सर्वोतपरी मदत करण्यास तत्पर असल्याची ग्वाही दिली.
कोकणातील शोभिवंत मत्स्य शेतीचा विकास व्हावा म्हणून रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था, रत्नागिरीची स्थापना करण्यात आलेली आहे. शोभिवंत मत्स्य शेती आणि शेतक-याच्या सर्वांगीण विकासाकरिता संस्था कार्यरत असून, विविध कार्यक्रमातून शोभिवंत मत्स्य शेतक-यांना तांत्रिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात येते.

कार्यशाळेत केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्थेच्या शास्त्रज्ञ डॉ माधुरी पाठक यांनी शेतक-यांनी मत्स्य शेतीची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल विषयी मार्गदर्शन केले. मत्स्य संवर्धन विभागाचे प्राध्यापक डॉ गजानन घोडे यांनी ‘शोभिवंत मत्स्य शेतीतील मासळीवर येणारे रोग आणि त्यावर उपाय योजना’ या विषयी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी उत्कर्षा कीर यांनी मा. मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्या वतीने ‘शासकीय योजना’ बद्दल विस्तृत माहिती दिली. तारापोरवाला सागरी मत्स्य शास्त्रीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ भरत यादव यांनी ‘मत्स्य विद्याशाखेचे शोभिवंत मत्स्य शेतीतील संशोधन’ याविषयावर उपस्थित शेतक-यांना माहिती दिली. सागरी पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाचे श्री मंगेश गावडे यांनी ‘शोभिवंत मत्स्य शेतीतून मत्स्य निर्यातीकरिता निर्यातदार म्हणून नोंदणी’ या विषयावर माहिती दिली. त्यानंतर अनुभवी मत्स्य शेतक-याचे मार्गदर्शन सत्रात ग्रोवेल मत्स्य खाद्य कंपनीचे श्री मॅथुज यांनी मत्स्य खाद्य व्यवस्थापन विषयी संवाद साधला. अॅक्वारीयमकरिता प्रकाश योजना: नवीन शोध व संधी या विषयी पुणे येथील श्री योगेश मोडक यांनी माहिती दिली. शोभिवंत मत्स्य टाकीची रचना आणि अक्वा-स्केपिंग बद्दल श्री. अमित देवारे यांनी माहिती दिली.

कार्यशाळेत रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्थेतर्फे मुंबई येथील वरिष्ठ शोभिवंत मत्स्य पालक श्रीराम हतवळणे आणि श्री विस्पी मिस्त्री यांना जीवन-गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी संस्थेचे आभार मानले आणि भविष्यात येणा-या सर्व नवीन मत्स्य शेतक-यांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. शोभिवंत मत्स्य शेती व्यवसाय हा एक उत्कृष्ट आणि लाभदायी व्यवसाय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्थेचे संस्थापक सदस्य आणि तांत्रिक सल्लागार मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य आणि रत्नागिरी येथील सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्राचे ‘वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ केतन चौधरी यांनी संस्था स्थापन करण्याचे उदिष्ठे, गेल्या एक वर्षात केलेल्या कामाचा आढावा, संस्थे मार्फत केवळ रत्नागिरीच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील शोभिवंत मत्स्य शेतक-यांना संघटीत करून हा व्यवसाय पुढे नेण्याकरिता पुढील योजना मांडल्या. शोभिवंत मत्स्य शेतक-यांनी यावेळी पुढील सर्व व्यावसायिक योजनेत सहभागी होण्याकरिता समर्थन केले. पुढील वर्षी जुलै महिन्यात दोन दिवसाचे चर्चासत्र आणि बिजिनेस मिटिंग आयोजित करण्याचे मान्य करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष हर्णे-दापोली येथील यशस्वी शोभिवंत मत्स्य शेतकरी फहाद जमादार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ संजय भावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शोभिवंत मत्स्य शेतक-यास विद्यापीठाकडून अत्यंत समाधानकारक सहाय्य आणि सहानुभूती मिळत असल्याने त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ मकरंद जोशी, शिक्षण संचालक डॉ सतीश नारखेडे, कुलसचिव डॉ संतोष सावर्डेकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यशाळेचे सूत्र-संचालन मत्स्य महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागाचे प्राध्यापक डॉ सुहास वासावे आणि हंस अक्वाकल्चरचे हसन मसलाई यांनी केले.

​कार्यशाळेच्या आयोजनाकरिता मत्स्य महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ डबीर पठाण, डॉ. ए यु पागारकर प्राध्यापक डॉ. भावेश सावंत, श्री. मकरंद शारंगधर, श्री. विनायक विश्वासराव, डॉ. संदेश पाटील, श्री, भालचंद्र नाईक, सागरी जीव-शास्त्रीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ श्री सचिन साटम, डॉ हरीश धमगाये यांचे सहकार्य लाभले. रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राकेश सावंत (मुंबई), खजीनदार श्री दिव्यजीत गोरे (रत्नागिरी), सदस्य श्री. राजकिरण साटम (मुंबई), श्री अमित आणि अविनाश सुवारे (रत्नागिरी), श्री परेश पाटील (पनवेल), सोलापूर येथील श्री राजकुमार कोळी, पुणे येथील चेतन साळुंखे, मुंबईचे श्री सुरेंद्र शिरधनकर, रोहा-रायगड येथील हसन मसलाई यांनी आयोजनाकरिता कष्ट केले.

शोभिवंत मत्स्य शेतक-यांना या कार्यशाळेचा आपल्या समस्या सोडवण्यासाठी मोठा फायदा होत असून कोकणातील आणि महाराष्ट्रातील शोभिवंत मत्स्य शेती उद्योगास मोठी चालना मिळेल, असा विश्वास सहभागी शोभिवंत मत्स्य शेतक-यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 14-07-2025