कुंभार्ली घाटातील दरडी हटविण्यात अडचणी

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर कुंभार्ली घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. कोसळलेल्या या दरडी हटवायच्या झाल्यास मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन घाटातील रस्ता बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे कोसळलेली दरड हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील दरड हटवली तरी अडचण, नाही हटवली तरी अडचण, अशा दुहेरी अडचणीमध्ये सार्वजनिक बांधकाम खाते सापडले आहे.

गुहागर-विजापूर मार्गावर कुंभार्ली १४ किमीचा घाट रस्ता आहे. पावसाळ्यात हा घाट रस्ता दरवर्षी धोकादायक ठरतो. अतिवृष्टीच्या काळात जागोजागी दरडी कोसळून या घाटातील वाहतूक बंद पडते. यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याची व्यवस्था केली आहे. या नाल्यात डोंगरातून येणारे दगडमाती साचल्यानंतर पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येते आणि डांबरी रस्त्यावर सातत्याने पावसाचे पाणी वाहत असताना रस्ता खराब होतो. घाटातील धबधबे सुरू झाले आहेत. काही ठिकाणी धबधब्याचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे.

कुंभार्ली घाटातील डोंगरात काळा दगड आहे. पावसाळ्यात या दगडाचा काही भाग अचानक रस्त्यावर कोसळतो. त्यासोबत मातीही येते. सुदैवाने आतापर्यंत या दगडामुळे कोणत्याही वाहनाचे नुकसान झालेले नाही. हे दगड रस्त्यावर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग बाजूला करते. मात्र घाटात सातत्याने कोसळत असलेल्या दरडीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची चिंता वाढली आहे. यावर्षी अजून मोठा पाऊस झालेला नाही. अतिवृष्टी झालेली नाही. तरीही घाटात जून महिन्यात पाच ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या हटवल्या, मात्र काही ठिकाणी दरडी कोसळून माती नाल्यात साचली आहे. ती माती जेसीबीच्या सहाय्याने हटवली तर डोंगराचा काही भाग खाली येऊन रस्ता बंद होण्याचा धोका आहे. काही ठिकाणी मातीसह झाडेही खाली येण्याचा धोका आहे.

बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी जेसीबीच्या सहाय्याने कोसळलेली दरड बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा डोंगराची माती खाली येऊ लागली. त्यामुळे नाल्यात साचलेल्या मातीला जेसीबी न लावता रस्त्यावर आलेली माती बाजूला करण्यात आली.

कुंभार्ली घाट सध्या वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. घाटात कोसळलेल्या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाने हटविले आहेत. काही दरडी हटविल्या तर डोंगराची माती खाली येऊन रस्ता बंद होण्याचा धोका आहे. पाऊस थांबल्यानंतर त्याही हटविल्या जातील. घाटात पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. घाटातून प्रवास करताना नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. एखादी घटना घडली तर तत्काळ पोलिसांना किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याची माहिती द्यावी- अरुण मुलाजकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 14/Jul/2025