चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावर गुहागर ते पोफळी या दरम्यान इंडियन रोड काँग्रेसचे मार्गदर्शक तत्त्वानुसार २० जुलैपर्यत वृक्ष लागवड न केल्यास २१ जुलैला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी दिला आहे.
त्यांनी याबाबत प्रशासनाला पत्र दिले आहे. गुहागर-विजापूर मार्गावर वृक्ष लागवड व्हावी यासाठी आम्ही मागील वर्षी आंदोलन उभे केल्यावर काही प्रमाणात दीड ते दोन फुटांची रोपे लावण्यात आली. काही ठिकाणी वरच्या बाजूस डोंगरात वाढलेली परदेशी जातीची आकेशियाची रोपे काढून तेथेच लावलेली आढळून येतात. हा फक्त तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होता. या रोपांपैकी ९५ टक्के रोपे मरून गेली आहेत. याकरिता मार्च २०२५ पासून उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, रत्नागिरी व मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कोकण विभाग, कोकण भुवन यांच्याकडे सतत प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देणे, वारंवार ई-मेलद्वारे आठवण करून देणे व भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करीत आहे. प्रत्येक वेळी पोकळ आश्वासनाव्यतिरिक्त काहीही अद्याप झालेले नाही. निम्मा जुलै महिना होत आहे. वास्तविक ही सर्वस्वी जबबदारी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांची आहे.
२० जुलै २०२५ पूर्वी संपूर्ण गुहागर-विजापूर रस्त्यावर गुहागर ते पोफळी जेथे जेथे राष्ट्रीय महामार्गाची जागा आहे, तेथे मार्गदर्शक तत्त्वानुसार पहिल्या रांगेत १०-१० फुटांवर दोन फूट लांब दोन फूट रुंद व दोन फूट खोल, असे खड्डे मारून त्यामध्ये सेंद्रिय खत टाकून स्थानिक प्रजातीची पाच ते सात फूट उंचीची रोपे लावून त्याभोवती जाळी उभी न केली गेल्यास राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या आवारात २१ जुलैपासून उपोषण करणार असल्याचे शाह यांनी पत्रात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 14/Jul/2025














