दापोली : मासेमारी बंदी कालावधी ३० जुलैपर्यंत असतानाही शासनाचा आदेश धाब्यावर बसवून परजिल्ह्यातील हायस्पीड ट्रॉलर्सकडून हर्णे बंदरात बेधडक मासेमारी केली जात आहे. बेकायदेशीर मासेमारीमुळे मच्छीमारांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या मच्छीमारांना अभय कोणाचे अशी प्रतिक्रिया मच्छीमारांमधून व्यक्त होत होता. आठ ते नऊ जाळी पापलेट परजिल्ह्यातील मच्छीमारांना मिळत असल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.
दरवर्षीप्रमाणे १ जूनपासून ३० जुलैपर्यंत शासनाचा मासेमारी बंदचा आदेश असतो. या दिवसांमध्ये मासळी प्रजननासाठी किनाऱ्याकडे येत असते. तसेच, मॉन्सूनचा कालावधी सुरू असतो. वादळसदृश परिस्थिती असते. समुद्राला उधाण असते या सर्व कारणांमुळे या दिवसांमध्ये मासेमारी शासनाकडून बंद असते. सध्या तरी शासनाच्या नियमांप्रमाणे किनारपट्टीलगतच्या सर्वच भागांमधील मासेमारी उद्योग बंदच आहेत. रविवारी हर्णे बंदरासमोर अचानक किमान सुमारे १५ नौका मासेमारी करताना दिसल्या. या नौका नक्की कुठल्या आहेत हा मोठा प्रश्न मच्छीमारांना पडला आहे. या नौका किमान ५ ते ६ नॉटिकल मैलावर मासेमारी करत होत्या.
हर्णे पाजपंढरीतून मत्स्यव्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही संपर्क होऊ शकला नाही. येथील मच्छीमारांनी खात्याला देखील कळवले तरीदेखील कोणीही कोणतीही कारवाई केलेली नाही. या नौका शनिवार (ता. १२) सायंकाळपासून याठिकाणी मासेमारी करीत आहेत. त्यामुळे बपंर मासळी मारून नेल्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
बंदी असताही खूपच जवळ मासेमारी करत आहेत. आम्ही नियमात राहून आमचा उद्योग करायचा आणि यांनी अवैधरीत्या आमच्या बंदरात येऊन मासेमारी करून मासळी मारून घेऊन जायचे. यंत्रणा ठप्प बसली आहे. काहीच कोण करत नाही. यापुढे असेच चालू राहिले तर मच्छीमार कायदा हातात घेण्याच्या तयारीत आहेत- प्रकाश रघुवीर, उपाध्यक्ष, हर्णे बंदर कमिटी
नियम फक्त दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील मच्छीमारांनीच पाळायचे का ? आणि या बाहेरच्या नौका बिनधास्त मासेमारी करून जाणार. शासन कुठे आहे? यांना कोण पाठीशी घालत आहे? एकही अधिकारी याची दखल घेण्यास तयार नव्हते. स्थानिकांनी कोणाकडे बघायचे. आम्हाला कोणी वाली आहे की नाही?- अनंत चोगले, मच्छीमार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 14/Jul/2025














