रत्नागिरी, १३ जुलै : “आपल्याला कोणताही नवीन आयडॉल शोधण्याची गरज नाही. दानशूर भागोजीशेठ कीर आणि मायनाक भंडारी हेच आपले खरे आदर्श आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे केले. यावेळी त्यांनी दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या रत्नागिरीतील स्मारकाला आणखी ५ गुंठे जागा देण्याची महत्त्वपूर्ण घोषणाही केली.
रत्नागिरी तालुक्यातील भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त ते रविवार, १३ जुलै रोजी कित्ते भंडारी हॉल येथे बोलत होते. हा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र विधान सभेचे सचिव आणि मिऱ्या गावचे सुपुत्र जितेंद्र भोळे, एलआयसी ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक एस. बी. मायनाक, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष आशिष पेडणेकर, निवृत्त उपविभागीय अधिकारी राजेंद्र बिजें, डायटचे प्राचार्य सुशील शिवलकर, निवृत्त DYSP विलास भोसले, निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा नागवेकर, ज्येष्ठ उद्योजक सुनीलशेठ भोंगले, ज्येष्ठ बॅडमिंटनपटू प्रसन्न आंबुलकर आणि संघाचे अध्यक्ष राजीव कीर आदी मान्यवर उपस्थित होते.
इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर, सी.ए., वकील, एमपीएससी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याचबरोबर, इयत्ता १० वी मध्ये ९० टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल आदिश उदय नागवेकर याचा शिष्यवृत्ती व रोख पारितोषिक देऊन विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच, इयत्ता १२ वीतील जागृती संजय मसुरकर हिने ९३.१३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. सीए परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल अदिती संदेश नागवेकर व नयन सुबोध सुर्वे, तर एमबीबीएस झालेल्या वेदांत अविनाश मयेकर यांनाही गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे, एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल शिवानी उदय हातिसकर व सौ. पल्लवी प्रसन्न नार्वेकर यांनाही गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मयेकर, सौ. प्रज्ञा तिवरेकर व अमृता मायनाक यांनी केले, तर संघाचे खजिनदार आर. के. विलणकर यांनी आभारप्रदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 15-07-2025














