रत्नागिरी : मिरजोळे, झाडगाव, उद्यमनगर एमआयडीसीतील उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हरचिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेतील नवीन बंधारा आता पूर्णत्वाच्या दिशेने असून, त्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ २०२४ मध्ये सुरू होऊन विक्रमी वेळेत पूर्णत्वाकडे जात आहे, विहिरीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील वर्षीपासून उद्योजकांची दीर्घकाळची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होणार आहे.
हरचिरी येथे एमआयडीसीने १९७२ मध्ये एक जुना बंधारा बांधला होता. त्याची साठवण क्षमता ०.२९७ दशलक्ष घनमीटर होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी शहर आणि एमआयडीसी परिसरात वाढलेली लोकसंख्या, तसेच उद्योगांच्या वाढत्या पाणी वापरामुळे या जुन्या बंधाऱ्यातून मिळणारे पाणी अपुरे पडू लागले होते. विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर बनत होती, ज्यामुळे स्थानिक रहिवासी आणि उद्योजक दोघेही त्रस्त होते. या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका नव्या आणि मोठ्या बंधाऱ्याची नितांत गरज होती.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पुढाकार घेतला. त्यांनी एमआयडीसीच्या माध्यमातून नवीन बंधाऱ्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून घेतला आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळवून दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प वेगाने मार्गी लागला आहे, ज्यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
या नवीन बंधाऱ्याची साठवण क्षमता ०.४५६ दशलक्ष घनमीटर आहे. जुन्या बंधाऱ्याच्या ०.२९७ क्षमतेच्या तुलनेत यामध्ये ०.१५९ दशलक्ष घनमीटर अधिक पाणी साठवता येणार आहे. याचा अर्थ, पूर्वर्वीपेक्षा तब्बल १५९ हजार घनमीटर (१५९ दशलक्ष लिटर) अधिक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यामुळे उद्योगांना मुबलक पाणी मिळेलच, पण शहरानजीकच्या अनेक गावांची पाणीटंचाईची समस्याही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी एकूण १३ कोटी सात लाख ५८ हजार ६१२ रुपये खर्च अपेक्षित आहे. विशेष बाब म्हणजे, या नवीन बंधाऱ्यामुळे आजूबाजूचे कोणतेही शेती क्षेत्र किंवा वस्ती बाधित होत नाही, ज्यामुळे स्थानिकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पर्यावरणाची कोणतीही हानी न होता हा प्रकल्प पूर्ण होत असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
नवीन बंधाऱ्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, उर्वरित अवघे ५ टक्के काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर हा बंधारा पुढील वर्षीपासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येईल. या प्रकल्पामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला असून, जिल्ह्यातील औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.
सध्या या धरणाजवळील पाणी उपसा विहीरीचे काम सुरु आहे. पावसामुळे ते सध्या थांबले आहे. त्यामुळे विहीरीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील वर्षीपासून या नवीन बंधाऱ्यात पाणी साठवण्यास सुरुवात होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागल्याबद्दल उद्योजकांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 15/Jul/2025














