गुहागर-विजापूर महामार्गावर स्थानिक प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करण्याची मागणी

चिपळूण : राष्ट्रीय गुहागर-विजापूर महामार्गावर इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गुहागर ते पोफळी या टापूत स्थानिक प्रजातीची वृक्षरोपांची लागवड सुरू न झाल्यास २१ जुलै रोजी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

या संदर्भात शाह यांनी राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनानुसार, गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वृक्षरोपांची लागवड करावी अशी मागणी सातत्याने सुरू आहे. मात्र, याकडे संबंधित विभागासहीत ठेकेदारही दुर्लक्ष करीत आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काही प्रमाणात दीड ते दोन फुटांची रोपे लावण्यात आली. त्यामध्ये बहुतांश परदेशी वृक्षांची रोपे आहेत.

ती देखील आजूबाजूच्या रानात व डोंगरात नैसर्गिकरित्या वाढलेली रोपे काढून ती लावण्यात आली आहेत. काही ठिकाणी लावलेली रोपे सुकून गेली आहेत. या प्रकारावरून सातत्याने मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. या संदर्भात मार्च महिन्यात उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग तसेच मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कोकण भवन यांच्याकडे अनेकवेळा निवेदन देऊन व प्रत्यक्ष संपर्क करूनदेखील अद्यापपर्यंत या बाबत नियोजन झाले नाही.

येत्या २० जुलै पर्यंत महामार्गावर गुहागर ते पोफळी या ठिकाणी महामार्गाच्या जागेलगतच मार्गदर्शक तत्त्वानुसार व स्थानिक प्रजातीची वृक्षरोपे लावण्याचे काम सुरू न झाल्यास सोमवार दि. २१ जुलैपासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले जाईल. वृक्षरोपांची लागवड करण्यासाठी एकाच रांगेत दहा-दहा फुटावर दोन फूट लांब-रूंद व खोल खड्डे मारून त्यात सेंद्रीय खत टाकून पाच ते सात फूट उंचीची स्थानिक व स्वदेशी प्रजातीची वृक्षरोपे लावण्यात खड्डे मारून त्यात सेंद्रीय खत टाकून पाच ते सात फूट उंचीची स्थानिक व स्वदेशी प्रजातीची वृक्षरोपे लावण्यात यावीत, असे निवेदनात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 15/Jul/2025