संगमेश्वर : काल रात्रीपासून संगमेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजारात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पुराचे पाणी बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. आपले नुकसान टाळण्यासाठी अनेक दुकानदारांनी दुकानांमधील वस्तू आणि महत्त्वाचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. याचा परिणाम केवळ बाजारपेठेवरच नाही, तर स्थानिक रहदारीवरही झाला आहे. रामपेठ, कोंडआसुर्डे, मराठी शाळा आणि अंगणवाडीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पूरस्थितीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. गरज पडल्यास तात्काळ मदतकार्य सुरू करण्याची तयारीही प्रशासनाने दर्शवली आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे पुन्हा एकदा करण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 15-07-2025














