मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा काल पार पडली आहे. त्यानंतर आज महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संयुक्त परिषदेत राज्यात विविध क्षेत्रात विकास झाल्याचा दावा करण्यात आला.
यावेळी महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले. या पत्रकार परिषदेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.
एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारने दोन ते सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळात असंख्य कामे केली आहेत. केलेल्या कामाचे रिपोर्ट काढायला हिम्मत लागते आणि ती हिम्मत महायुती सरकारकडे आहे. पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमाकांवर आहे. आम्ही एवढी कामे केली की ती रिपोर्ट कार्डमध्येही सामावत नाहीत. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोडचे काम सरकारने केले आहे. महाविकास आघाडीच्या काळात विकासकामांना ब्रेक लागला होता. अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने प्रकल्प बंद करण्याचे काम केले. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता. पण महायुतीचे सरकार येताच महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर आला, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
राज्यातला सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅन त्याच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. तो कॉमन मॅन नव्हे सुपरमॅन व्हायला पाहिजे. राज्यातील सर्वसामान्य माणसाला आम्हाला ताकद द्यायची आहे, म्हणून तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. मेट्रो प्रकल्पाला स्थगिती दिल्याने १७ हजार कोटी रुपये जास्त खर्च झाले. अन्यथा आम्ही लाडक्या बहिणींना अधिक पैसे देऊ शकलो असतो. लाडकी बहीण योजनेसाठी आमचे लक्ष्य २ कोटी ५० लाख रुपये होते. आता सुमारे २ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात पैसे गेले. नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होणार हे माहीत होतं, म्हणून ते पैसे ऑक्टोबर महिन्यात देऊन टाकले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विरोधक म्हणतात, आम्ही सत्तेत आलो तर पोलखोल करणार, महायुतीने आणलेल्या सर्व योजना बंद करणार, पोलखोल करणार, जेलमध्ये टाकणार, तुमची पोलखोल यापुर्वीच झाली आहे, असं म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. या योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. हे खुलेआम बोलायला लागले, त्यांच्यात जेलसी निर्माण झाली आहे. त्यांच्या अशा बोलण्याने लोक त्यांच्या विरोधात जातील. लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला. तर त्याचा कार्यक्रम झाला समजा. आमच्या लाडक्या बहीणी हे ऐकून घेणार नाहीत. आम्ही त्यांना सांगितलंय केंद्र सरकार आणि आम्ही मिळून आमच्या बहिणींना लखपती बनवणार आहोत, त्यासाठी आम्ही काम करत आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 16-10-2024