चिपळूण : शहरातील बुरूमतळी येथील मुख्य रस्त्यावर सोमवारी विचित्र अपघात घडला. रस्त्यावर भटकणाऱ्या एका कुत्र्याने थेट रिक्षाचालकाने पकडलेल्या स्टिअरिंगवरच उडी घेतल्याने रिक्षा उलटली झाली. रिक्षेचा वेग कमी असल्याने आणि समोरून कोणते वाहन न आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या रिक्षात एक वयस्कर महिला होत्या. या प्रकारामुळे त्या घाबरल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
टेरव येथील परेश काणेकर हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन चिपळूणच्या दिशेने निघाले होते. या रिक्षात वयोवृद्ध महिला बसल्या होत्या. शहरातील पाग पॉवरहाऊस ते चिंचनाका या रस्त्यावरून जात असताना बुरूमतळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोर अचानक एका कुत्र्याने थेट रिक्षात उडी घेतली.
तो कुत्रा स्टिअरिंगवरच आदळल्याने आणि अचानक हा प्रसंग घडल्याने परेश काणेकर गोंधळून गेले. त्यांनी रिक्षा सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र कुत्र्याच्या धक्क्याने त्यांच्या हातातील स्टिअरिंग फिरले आणि रिक्षा उलटली. रिक्षामध्ये बसलेल्या आजी आणि परेश काणेकर हे देखील रिक्षासह रस्त्यावर कोसळले. या वेळी या परिसरात दुसरे वाहन न आल्याने मोठा अनर्थ टळला. देव बलवत्तर म्हणून आजी व परेश हे दोघेजण बालंबाल बचावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 15/Jul/2025














