रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी; बळिराजा सुखावला

रत्नागिरी : मागील आठवडाभर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर पूर्णतः ओसरलेला होता. मात्र, सोमवारी (ता. १४) दिवसभर जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे बळिराजा सुखावला असून, कोरड्या पडलेल्या भातखेचरात पाणी साचू लागले आहे. पुढील २४ तासांत पावसाचा जोर राहील, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी ८: ३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २०.१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड १७.२५, खेड ३२.२८, दापोली २०.१४, चिपळूण २८, गुहागर ११.४०, संगमेश्वर २०.५०, रत्नागिरी १५.७७, लांजा २६, राजापूर १० मिमी पाऊस झाला आहे. मागील आठवड्यात पावसाचा जोर कमी झालेला होता. अधुनमधून एखादी सर पडून जात होती. त्यामुळे भातलावण्यांच्या कामांना खीळ बसली होती. दुपारी पडणाऱ्या उन्हामुळे कातळावरील भातरोपांना फटका बसलेला होता. त्या ठिकाणच्या भातलावण्या पूर्ण करण्याचे मोठे आव्हान होते; मात्र अधूनमधून पडणाऱ्या सरींचा आधार घेऊन काही शेतकऱ्यांनी पहिल्या आठवड्यात भातलावण्या आटपून घेतल्या.

पुढे सलग आठ दिवस पाऊस कमीच राहिल्याने बळिराजाची चिंता वाढली. भातखाचरात पाणी नसल्यामुळे रोपांची वाढ कशी होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी सकाळपासून सरींना सुरुवात झाल्याने शेतीला फायदा होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 15/Jul/2025