खेड : कशेडी गव्हाणकरवाडी येथे दरड कोसळली; वाहतूक ठप्प

खेड : खेड तालुक्यातील कशेडी येथील गव्हाणकरवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरडीमुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, या भागातील नागरिक व विद्यार्थी यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गव्हाणकरवाडी वाडीमध्ये सुमारे 100 हून अधिक घरे असून, येथे एस.टी. बसद्वारे विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मार्ग बंद झाल्याने एस.टी. बस वाहतूक थांबवावी लागली आहे.

वाहतूक ठप्प झाल्यामुळे या वाडीतील नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाचा वापर करावा लागत आहे. मात्र, हा मार्गही धोकादायक असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, खेड तालुका प्रशासन व महसूल विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरड हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणा तैनात करण्याचा प्रयत्न सुरू असून, लवकरात लवकर मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली असून, शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे अजूनही दरड कोसळण्याचा धोका असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 15-07-2025