परशुराम घाटामधील ‘ती’ संरक्षक भिंत खचतेय

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील कोसळलेली संरक्षक भिंत व खचलेल्या काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून प्लास्टिक कापडाचे आच्छादन टाकले आहे. या ठिकाणाचे कामकाज थांबले असून, पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे; मात्र अजूनही या ठिकाणी काही भाग खचत असल्याने एकेरी मार्गावर वाहतूक सुरू ठेवली आहे. दरडीकडील बाजूकडून वाहतूक बंद ठेवली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट हा कोकणातील महत्त्वाचा घाट आहे. या घाटाची एकूण लांबी ५.४० किलोमीटर आहे. महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत चिपळूण आणि खेड अशा दोन टप्प्यांतील कंत्राटदार कंपनीमध्ये हा घाट विभागला गेला आहे. घाटातील संपूर्ण कॉक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर संरक्षक भिंतीच्या कामावर लक्ष केंद्रित केले; मात्र २०२२ मध्येच या कॉक्रिटीकरणातील काही भाग खचला, परिणामी, त्यावर उपाययोजना म्हणून संरक्षक भिंत व गॅबियन वॉल उभारण्याचा निर्णय झाला; परंतु हे काम सुरू असताना अचानक संरक्षक भिंत कोसळली, त्या पाठोपाठ पायथ्यालगत उभारलेल्या गॅबियन वॉलबा भागही महिन्याभरापूर्वी पहिल्याच पावसात खचला. त्यानंतर आता या ठिकाणचे काम पूर्णतः थांबविण्यात आले आहे.

पावसाळ्यानंतर गॅबियन वॉलच्या रचनेत काही किरकोळ बदल करून काम सुरू केले जाणार आहे. तसा प्रस्तावही तयार केला जात आहे; मात्र आता पावसाचा जोर वाढल्याने या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना म्हणून कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी प्लास्टिकचे आच्छादन टाकण्यात आले आहे.

प्रवास अजूनही असुरक्षित
परशुराम घाटातील प्रवास अजूनही सुरक्षित राहिलेला नाही. एकीकडे लोखंडी जाळ्यांच्या माध्यमातून दरडीचा भाग संरक्षित करण्यात आला आहे; मात्र रस्त्याच्या खालील बाजूस अजूनही काही ठिकाणी काँक्रिटीकरण खचणे, तडे जाण्याचे प्रकार घडत आहे. तसेच काही ठिकाणी भरावाची मातीही थेट वस्तीत पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात आहे. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रीय महामार्गांमार्फत परशुराम घाटातील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 15/Jul/2025