चिपळूण : तालुक्यातील मिरजोळी- कोलेखाजन येथे काही दिवसांपूर्वी तुटलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून पाच दुभत्या म्हशी ठार झाल्या होत्या. याप्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत मिरजोळीच्या तत्कालीन वायरमनला निलंबित करण्यात आले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधीनंतर ही कारवाई करण्यात आली.
मुदस्सर खान असे निलंबन झालेल्या वायरमनचे नाव आहे. जून महिन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे कोलेखाजन परिसरात विद्युत तार तुटून पडली होती. याचा प्रमोद कदम यांच्या सहा म्हशींना झटका लागला. त्यातील पाच म्हशींचा तडफडून जागीच मृत्यू झाला. तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी महावितरणच्या कार्यालयात बैठक झाल्यानंतर भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी केलेल्या सहकार्यानंतर कदम यांना नुकसान भरपाई देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यानुसार ती देण्यातही आली आहे. मात्र, असे असले तरी महावितरणकडून प्रत्यक्षात दिली जाणारी नुकसान भरपाई कमी असल्याचा मुद्दा आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात उपस्थित करीत मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली होती.
तर दुसरीकडे आमदार जाधव यांनी घटना घडल्यानंतर अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी वेळेत आले नाहीत. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच पाच म्हशी ठार होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई केलीत, असा मुद्दा उपस्थित केला. यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वायरमन खान यांना निलंबित केले असून, काही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 15/Jul/2025














