रत्नागिरी : तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत वळके येथील पूजा भुवड प्रथम

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका कृषी विभागातर्फे खरीप हंगाम २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेचा निकाल जाहीर करणयात आला असून, वळके येथील पूजा भुवड यांनी हेक्टरी ५७.१९८३ क्विंटल भात उत्पादन घेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

शेतकऱ्यांनी सुधारित कृषी पद्धतीचा अवलंब करून उत्पादन वाढवावे आणि शेतकरी समुदायामध्ये निरोगी स्पर्धा वाढवावी, या उद्देशाने भात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक खानू येथील संजय शांताराम सोलकर यांनी मिळविला. त्यांनी भाताचे हेक्टरी ४७.०८८२ क्विंटल उत्पादन घेतले. विजेत्या प्रथम व द्वितीय क्रमांकांना अनुक्रमे रोख ५००० व ३००० रुपयांचे पारितोषिक, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पंचायत समितीकडून विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा जाहीर
रत्नागिरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आगामी खरीप हंगाम २०२५ मध्ये होणाऱ्या भात व नागली पीक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 15/Jul/2025