रत्नागिरीत बंद घरातून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास; अज्ञात चोराचा प्रताप

रत्नागिरी, दि. १५ जुलै: शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, राधाकृष्ण नगर येथील एका बंद घरातून अज्ञात चोरट्याने दोन स्मार्टफोन आणि रोख रक्कम असा एकूण ३१,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १३ जुलै २०२५ रोजी घडली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र संजय पाटील (वय २४, रा. ए-लतिफ बिल्डिंग, दर्गा मातेजवळ, राधाकृष्ण नगर, रत्नागिरी) हे १३ जुलै रोजी सकाळी १०.३० ते ११.३५ च्या दरम्यान नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले होते. याच वेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या ए-लतिफ बिल्डिंगमधील भाड्याच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने घरातील दोन बॅगांमधून १५,००० रुपये किमतीचे दोन ‘वन प्लस नोर्ड सीई४ डार्क क्रोम (८/१२८)’ कंपनीचे स्मार्टफोन आणि १,५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ३१,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची माहिती पाटील यांना उशिराने समजल्यानंतर त्यांनी तातडीने कंपनीला कळवले आणि त्यानंतर सोमवारी (दि. १४ जुलै) सायंकाळी १८.१७ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५(अ) आणि ३३१(३) नुसार गुन्हा (गु.र.नं. ३२२/२०२५) दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 15-07-2025